
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम जातीयवादी शक्तींविरोधात संघर्ष केला. यासाठी भारिप बहुजन महासंघातील माजी पदाधिकाऱ्यांनी संविधान, लोकशाही व आरक्षण वाचविण्यासाठी संविधान बचाव अभियान नावाने महाराष्ट्रात नवीन आघाडी स्थापन केली आहे. या विधानसभा निवडणुकीत संविधान बचाव अभियानतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
संविधान बचाव अभियानचे महाराष्ट्राचे मुख्य संयोजक सुरेश गायकवाड यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की भारिप बहुजनने लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र आघाडी केली. त्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला होता. याचा अप्रत्यक्ष लाभ शिवसेना-भाजप युतीला झाला. विधानसभेत भारिप बहुजन महासंघाने कॉंग्रेस आघाडीसोबत आघाडी करावी अशी बहुतांश कार्यकर्त्यांची भावना व मानसिकता असतानाही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वंचित बहुजन आघाडीशी एमआयएमनेही फारकत घेतली आहे.
वंचितचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही, उलट धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊन पुन्हा जातीयवादी शक्तींनाच मदत होईल. यामुळे हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीशिवाय दुसरा अन्य पर्याय नाही. यासाठी महाराष्ट्रातील शाहू, फुले, आंबेडकरवादी मतदारांची मतविभागणी टाळण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला महाराष्ट्र संविधान बचाव समितीच्या वतीने पाठिंबा देण्यात येत असल्याचे सुरेश गायकवाड, गौतम लांडगे, गौतम खरात, प्रा. संजय कांबळे, प्रा. देविदास मनोहरे, बबन वडमारे, भास्कर साळवे, के.जी. म्हस्के या मराठवाड्यातील नेत्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.